कोलकात - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं आहे. भाजपा कार्यालयाजवळ 51 गावठी बॉम्ब सापडले आहेत. भाजपा कार्यालयाजवळील खिदिरपुर मोरे आणि हेस्टिंग्स क्रॉसिंग भागात हे बॉम्ब आढळले आहेत. वेळेत हे बॉम्ब निष्क्रिय करण्यात आल्याने मोठा धोका टळला. हे बॉम्ब कोणी ठेवले, याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या अँटी राउडी सेक्शन (एआरएस) ला सैनिकी इंटेलिजेंसकडून माहिती मिळाली होती. या इनपुटच्या आधारे एआरएसने रात्री उशिरा भाजपा कार्यालयाजवळ शोधमोहीम सुरू केली. यावेळी 51 देशी बॉम्बांनी भरलेली पांढऱ्या रंगाची पोते त्यांनी ज प्त केली. सर्व बॉम्ब जिवंत आणि विस्फोट अवस्थेत होते. तातडीने बॉम्ब स्क्वॉडने ते निष्क्रिय केले आहेत.
हे बॉम्ब कोणी जमा केले, याविषयी माहिती गोळा करण्यासाठी पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन करीत आहेत. यासह जवळपास राहणाऱ्या लोकांचीही चौकशी केली जात आहे. हे बॉम्ब भाजप कार्यालयाजवळ का ठेवले गेले, याचा शोध घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्ये यापूर्वीही अनेक हल्ल्यांमध्ये अशा बॉम्बचा वापर दिसून आला आहे.
सामुदायिक हॉलमध्ये सापडलेले होते 200 बॉम्ब -
विधानसभा निवडणुकीपूर्वी नानूर स्थित सरकारी सामुदायिक हॉलमधून पोलिसांनी धाड 200 गावठी बॉम्ब हस्तगत केले होते. तसेच घटनास्थळावरून बॉम्ब बनवण्याची सामग्रीही जप्त केली होती. सीआयडीच्या पथकाने हे बॉम्ब गावाच्या बाहेरील एका खुल्या मैदनात निष्क्रिय केले होते. तसेच 3 एप्रिलला दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातील बरूईपूर भागात तब्बल 41 क्रूड बॉम्ब हस्तगत केले होते. विशेष म्हणजे हे बॉम्ब एका झाडीत आढळून आले होते. अशाप्रकारे स्फोटकं, हत्यारं सापडणं हे पश्चिम बंगालमध्ये आता नेहमीचंच झालं आहे.