चंदीगड 500 Girl Claim Sexual Assault : विद्यापीठातील प्राध्यापकानं लैंगिक छळ केल्याचा आरोप तब्बल 500 विद्यार्थिनींनी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना हरियाणातील सिरसा इथल्या चौधरी देवी लाल विद्यापीठात घडली. प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या या 500 विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पत्र लिहून प्राध्यापकाचं निलंबन करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून चौकशी करण्याची मागणीही या विद्यार्थिनींनी केली आहे.
प्राध्यापकावर 500 विद्यार्थिनींचा लैंगिक छळाचा आरोप :चौधरी देवी लाल विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थिनींना त्याच्या कॅबीनमध्ये बोलावून अश्लिल कृत्य करत असल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी आपल्या पत्रात केला आहे. यात विद्यार्थिनींनी हा प्राध्यापक कार्यालयात बोलावून त्यांना बाथरुममध्ये नेणं, त्यांच्या गुप्तांगाला स्पर्श करणं, अश्लिल गोष्टी करणं, अश्लिल कृत्य करणं, आदी आरोप या पत्रातून करण्यात आले आहेत. या प्राध्यापकाच्या कृत्याला विरोध केल्यास त्यानं "अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागतील," अशी धमकी दिल्यासही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
विद्यार्थिनींनी पंतप्रधानांना लिहिलं पत्र :हरियाणातील चौधरी देवी लाल विद्यापीठातील या प्राध्यापकानं 500 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या पत्रानं देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणी पत्र लिहिलं आहे. त्यासह त्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कुलगुरू अजमेर सिंग मलिक, राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, गृहमंत्री अनिल विज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना या पत्राच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. चौधरी देवी लाल विद्यापीठाचे कुलसचिव राजेश कुमार बन्सल यांनी त्यांना निनावी पत्र मिळाल्याचं स्पष्ट केले आहे.
अनेक महिन्यांपासून सुरू आहे प्रकार :हरियाणातील चौधरी देवी लाल विद्यापीठात विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला आहे. त्यामुळं विद्यापीठाचे कुलगुरू अजमेर मलिक म्हणाले की, "प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले जात आहेत. पत्राची चौकशी करण्याची गरज नसून त्याची गांभीर्यानं दखल घेण्यात आली आहे." एडीजीपी श्रीकांत जाधव म्हणाले, "या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीप्ती गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यार्थिनींचे जबाब घेण्यात येत आहेत. पुढील तपास सुरू आहे. निवेदनाच्या आधारेच कारवाई केली जाईल. तपासाचा अहवाल आल्यानंतरच विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबत विचार केला जाईल."