हैदराबाद :नेपाळमध्ये रविवारी एक मोठा विमान अपघात झाला. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ आसनी प्रवासी विमान कोसळले. सध्या विमानतळ बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अशा घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. जगातील 5 सर्वात मोठ्या विमान अपघातांबद्दल जाणून घेऊयात.
1. लायन एअर फ्लाइट 610 :लायन एअर फ्लाइट 610 हे 29 ऑक्टोबर 2018 रोजी जावा समुद्रात कोसळले. इंडोनेशियातील जकार्ता येथील सोकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफच्या 13 मिनिटांतच हे विमान कोसळले होते. या अपघातात विमानातील सर्व १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर जवळपास वर्षभरानंतर तपास अधिकाऱ्यांनी या अपघाताचा अहवाल प्रसिद्ध केला होता. विमानाच्या डिझाईनमधील त्रुटी तसेच विमान कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे हा अपघात झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
2. इथिओपियन फ्लाइट 302 : 10 मार्च 2019 रोजी इथिओपियातील अदिस अबाबा येथून उड्डाण केल्यानंतर सहा मिनिटांनी इथिओपियन एअरलाइन्सचे फ्लाइट 302 क्रॅश झाले. विमानतळापासून सुमारे 40 मैल अंतरावर विमान ताशी 700 मैल वेगाने जमिनीवर आदळले. विमानातील सर्व 157 प्रवाशांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर विमानांच्या डिझाइनमधील त्रुटी, वायरिंगची दुरुस्ती आणि उड्डाण नियंत्रण प्रणालीची कसून तपासणी करण्याचे आणि वैमानिकांना अतिरिक्त प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले. इथिओपियाच्या अधिकाऱ्यांनी अपघातानंतर सांगितले की, विमानाच्या पायलटला दिलेले प्रशिक्षण अपुरे होते. एमसीएएस नावाची फ्लाइट कंट्रोल सिस्टीम चारवेळा कार्यान्वित झाली होती. कारण वैमानिकांनी विमान क्रॅश होण्यापूर्वी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते.
3. मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट 370 : मलेशिया एअरलाइन्सची फ्लाइट 370 ही 8 मार्च 2014 रोजी अचानक गायब झाली होती. इतिहासात रहस्यमयरित्या बेपत्ता झालेले विमान म्हणून त्यांची ओळख आहे. विमान बेपत्ता झाले तेव्हा विमानात 227 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. 29 जुलै 2015 रोजी हिंदी महासागरातील रीयुनियन या फ्रेंच बेटाच्या समुद्रकिनार्यावर विमानाचा पहिला तुकडा सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत विमानाचे दोन डझनहून अधिक तुकडे सापडले आहेत.
4. मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट 17 : मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट 17 हे विमान 2014 मध्ये 17 जुलै रोजी इस्टर युक्रेनमध्ये क्रॅश झाले होते. विमानातील सर्व 298 लोक ठार झाले होते. त्यापैकी बहुतेक प्रवाशी नेदरलँडचे होते. 2015 मध्ये, डच तपास पथकाला पूर्व युक्रेनवर रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्राने विमानाला धडक दिल्याचे आढळले. 2016 मधील आणखी एका तपासात असे म्हटले आहे की धडक दिलेले क्षेपणास्त्र रशियामधून डागण्यात आले होते. पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी गोळीबार केला होता. फुटीरतावाद्यांनी मलेशिया एअरलाइन्सचे फ्लाइट 17 पाडल्याचे समजते.
5. मंगळुरू विमान अपघात :मंगळुरू अपघात 22 मे 2010 रोजी झाला. एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान मंगळुरू विमानतळावर धावपट्टी ओलांडून दरीत पडले होते. यानंतर विमानाला आग लागली. यामध्ये एकूण 158 लोक मारले गेले, त्यापैकी फक्त आठ लोक वाचले होते. एका तपासात असे आढळून आले की, विमान वळवण्यासाठी पहिल्या अधिकाऱ्याने तीन कॉल करूनही आणि एन्हांस्ड ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टमकडून अनेक इशारे देऊनही लँडिंग हाताळण्यात कॅप्टनला अपयश आले.
हेही वाचा :BJP National Executive Meeting : पंतप्रधान मोदींचा आज रोड शो; भाजपची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक