बोकारो (झारखंड) : झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात मोहरमच्या मिरवणुकीत एक दुर्घटना घडली आहे. येथे मोहरमचा ताजिया 11,000 व्होल्टच्या हाय टेंशन वायरला लागला. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी 10 जण विजेच्या धक्क्याने गंभीररित्या भाजले. या सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे 4 जणांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे.
ताजिया हाय टेंशन वायरमध्ये अडकला : शनिवारी, बोकारो जिल्ह्यातील पेटारवार पोलीस स्टेशन अंतर्गत खेतको येथे स्थानिक मुस्लिम समाजाच्या लोकांनी मोहरमनिमित्त ताजिया मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत ताजिया उचलत असताना वरून जाणाऱ्या 11 हजार व्होल्टच्या हाय टेंशन वायरमध्ये तो अडकला. विद्युत तारेशी संपर्क झाल्यानंतर ताजिया मिरवणुकीसाठी ठेवलेल्या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात दहा जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बोकारो जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू : या अपघातात ठार झालेले सर्वजण खेतकोचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये आसिफ रझा (21 वर्षे), इनामुल रब (35 वर्षे), गुलाम हुसैन (18 वर्षे) आणि साजिद अन्सारी (18 वर्षे) यांचा समावेश आहे. याशिवाय सलुद्दीन अन्सारी, इब्राहिम अन्सारी, लाल मोहम्मद, फिरदौस अन्सारी, मेहताब अन्सारी, आरिफ अन्सारी, शाहबाज अन्सारी, मोजोबिल अन्सारी, साकिब अन्सारी हे जखमी झाले आहेत. या सर्वांवर बोकारो जनरल हॉस्पिटलमध्ये (बीजीएच) उपचार सुरू आहेत.
रुग्णालयाचा गलथान कारभार : या घटनेनंतर खेतको परिसरातील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोकांची इकडे - तिकडे धावपळ सुरू झाली. यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने डीव्हीसी बोकारो थर्मल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. मात्र येथे डॉक्टरांनी 4 जणांना मृत घोषित केले. यातील तीन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. रूग्णालयात रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने व रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांनी प्रचंड गोंधळ घातला. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना बोकारोला पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा :
- Buldhana Accident : बुलडाण्यात दोन खासगी बस समोरासमोर धडकून भीषण अपघात, सहा प्रवासी जागीच ठार, 19 जण जखमी
- Pune Car Accident : निरा देवघर धरणात कार कोसळून तिघांचा मृत्यू, वरंध घाटातील शॉर्टकट प्रवास ठरला जीवघेणा
- Kolhapur Car Accident : कारचा भीषण अपघात; दोघा तरुणांचा जागीच मृत्यू