राणीपेट (तामिळनाडू) - मंदिरात सुरू असलेल्या कार्यक्रमात भाविक दंग झाले असतानाच अचानक क्रेन कोसळून 4 भाविकांचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना किलावती गावात 22 जानेवारीला घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोंगलनंतर आठ दिवसांनी मयीलेरू हा उत्सव द्रोपदी अम्मन आणि मोंडी अम्मन येथील मंदिरात साजरा करण्यात येतो. मात्र चार भाविकांचा मृत्यू झाल्याने यावेळी या उत्सवाला गालबोट लागले आहे.
हार टाकतानाच क्रेन कोसळल्याने झाला मृत्यू :रात्रीच्या वेळी भाविक पूर्ण श्रद्धेने पूजा करण्यात मग्न होते. यावेळी काही भाविक क्रेनने देवाला हार टाकत होते साडेआठच्या सुमारास अचानक क्रेन खाली कोसळली. त्यामुळे 3 भाविक क्रेनखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात भुबलान ( वय 40 ) ज्योतीभाऊ ( वय 16) मुथ्थूकुमार ( 39) यांचा समावेश आहे. तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळी मोठी धावपळ झाली. यावेळी नातेवाईंनी मोठा आक्रोश केला.
गंभीर जखमीचा रुग्णालयात मृत्यू :देवाला हार ठाकत असताना क्रेन कोसळून अपघात झाला. या अपघातात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले होते. जखमींवर थुरुवल्लूर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील चिन्नास्वामी ( वय 85 ) यांचा दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे चांगलीच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.