नवी दिल्ली -केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 11 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. यादरम्यान आंदोलनस्थळी अनेक अपघात झाले असून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आता पुन्हा दिल्ली-हरियाणा सीमेवर असलेल्या शेतकरी आंदोलनस्थळाजवळ एक वेगवान ट्रकने दुभाजकावर बसलेल्या तीन महिला शेतकऱ्यांना चिरडले. यात तिघींचा मृत्यू झाला आहे. या शेतकरी महिला रिक्षाची वाट पाहत दुभाजकावर बसल्या होत्या.
अपघातानंतर ट्रकचा चालक घटना स्थळावरून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एकीचा रुग्णालयात मृत्यू झाला. प्राथमिक अहवालानुसार या महिला पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील होत्या. हा अपघात टिकरी सीमेजवळ घडला आहे. याठिकाणी पंजाब, हरियाणा आणि इतर ठिकाणचे शेतकरी जवळपास गेल्या 11 महिन्यांपासून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. यापूर्वी लखीमपूर खिरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिषने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवली होती. यात 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.