किन्नौर :हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील बरुआ कंडेमध्ये हिमवृष्टीदरम्यान महाराष्ट्रातील तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दीपक नारायण राव, राजेंद्र लालचंद पाठक आणि अशोक मधुकर भालेराव अशी मृत पर्यटकांची नावे आहेत. हे तिघेही मुंबईचे रहिवासी असल्याचे समजते आहे.
मृत पर्यटकांसोबत असलेल्या इतर पर्यटकांच्या मदतीने त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क केला जात आहे. त्यानंतर मृतदेह शिमला, चंदिगड किंवा दिल्लीला नेले जातील. दरम्यान, हिमवृष्टीतून वाचविलेल्या पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 13 पर्यटक रोहडूतील जांगलिकपासून बरुआ कंडे मार्गे सांगला जात होते. मात्र हिमवृष्टी व खराब हवामानामुळे तीन जणांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे उपायुक्त अपूर्व देवगण यांनी सांगितले. दरम्यान किन्नौरमध्ये बचाव कार्य राबवून 10 पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर मृतदेह आणण्यासाठी आयटीबीबी जवानांना घटनास्थळी पाठविल्याचे ते म्हणाले.