जामनगर : तीन मजली इमारत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुजरातच्या जामनगरमधील साधना कॉलनीत घडली. जयपाल सादिया, त्यांची पत्नी मितलबेन आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा शिवराज यांचा या घटनेत मृत्यू झाला. ही इमारत राहण्यास धोकादायक असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली होती. मात्र तरीही नागरिक या इमारतीत राहत असल्याची माहिती जामनगर महामंडळाचे आयुक्त डी एन मोदी यांनी दिली. या इमारतीत ढिगाऱ्याखाली दबलेल्या 9 नागरिकांना बचावण्यात यश आले आहे. जखमींना उपचारासाठी जामनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कसा झाला अपघात :जामनगर शहरातील साधना कॉलनीमध्ये गुजरात हाऊसिंग बोर्डाच्या 3 मजली इमारतीचा 30 वर्षे जुना भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारतीत एकूण सहा फ्लॅट होते. मात्र हे कुटुंबीय ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यामुळे यंत्रणेतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तात्काळ सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत दोन कुटुंबातील नऊ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जामनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
गर्भवती पत्नीसह पती आणि मुलाचा मृत्यू :एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. गर्भवती पत्नी, पती आणि मुलाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. साधना कॉलनी भागातील रहिवासी ब्लॉक क्रमांक 69 मध्ये ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घटनेतील ढिगारा हटविण्यासाठी अग्निशमन विभागाने जेसीबीची मदत घेतली. केवळ अग्निशमन विभागच नाही तर महापालिकेचे पथकही बचाव कार्यात सहभागी झाले होते. एकूण सहा फ्लॅटपैकी दोन फ्लॅटमध्ये कुटुंब राहत होती. जयपाल सादिया, त्यांची पत्नी मितलबेन आणि सात वर्षांचा मुलगा शिवराज यांचा मृत्यू झाला.