जयपूर - उच्च दाबाचा वीज प्रवाह असेलल्या तारेच्या संपर्कात स्लीपर बस आल्याने अपघात झाला. अचानक बसमध्ये वीजप्रवाह पसरल्याने बसने पेट घेतला. यावेळी अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. बसमधील प्रवाशांना काही कळायच्या आत बसने पेट घेतल्याने गोंधळ उडाला. जयपूर शहराच्या जवळ दिल्ली महामार्गावर ही घटना घडली.
आग लागल्याने गाढ झोपेतील प्रवाशांचा उडाला गोंधळ
बसला आग लागल्यानंतर चालक आणि सहाय्यकाने खाली उडी मारली. तर प्रवाशांनीही बसमधून खाली उड्या घेण्यास सुरुवात केली. मात्र, तीन प्रवाशांचा आगीत सापडून मृत्यू झाला. तर सुमारे १२ जण जखमी झाले. शहराजवळील चंडवाजी पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच अग्निशमन दलही काही वेळात दाखल झाले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. फक्त बसचा सांगाडा शिल्लक राहीला आहे.
मातीचा भराव टाकल्याने अपघात
सर्व जखमींना चंडवाजी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस वळण घेत असताना वरून जाणाऱ्या उच्च दाब तारेच्या संपर्कता आल्याने पेट घेतला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तेथे मातीचा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे जमिनीपासून १५ फुटांचे अंतर फक्त दहा फुटांवर आल्याने बसचा तारेला स्पर्श झाला.