अमरावती :आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यामध्ये झालेल्या एका भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. बट्टायूगुडेम गावाजवळ लॉरी आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन रविवारी हा अपघात झाला. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नारायण नाईक यांनी याबाबत माहिती दिली.
आज (रविवार) कृष्णा जिल्ह्यातून तीन ट्रॅक्टरमध्ये ६० लोक गुब्बाला मगम्मा मंदिराकडे निघाले होते. पहाटे चारच्या सुमारास यांपैकी एक ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला थांबला होता. यावेळी ओडिशाहून आलेल्या एका भरधाव लॉरीने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. या अपघातात एक मुलगी, एक वृद्ध व्यक्ती आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तर, सुमारे १७ जण जखमी झाले, ज्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे नाईक यांनी सांगितले.