गांधीनगर:बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकत लँडफॉलची क्रिया पूर्ण झाली. या लँडफॉल दरम्यान ताशी 145 किलोमीटर वेगाचे वारे वाहत असल्याने गुजरातमध्ये या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले आहेत. तर वीज प्रवाह खंडीत झाल्यामुळे 940 गावांमध्ये अंधार झाला आहे. या आपत्तीमुळे विद्युत खांब आणि 250 च्या आसपास झाडे उन्मळून पडली आहेत.
यावेळेत धडकलं चक्रीवादळ : गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकले होते. यादरम्यान जखाऊ आणि मांडवीसह कच्छ आणि सौराष्ट्रातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस झाला. आता बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने जात आहे. आज शुक्रवारी राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. आयएमडीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, चक्रीवादळ दुपारी अडीच वाजेपर्यंत नलियाच्या 30 किमी उत्तरेस सौराष्ट्र-कच्छ प्रदेशावर केंद्रित होते. बिपरजॉय ईशान्येकडे सरकला आणि गुजरातच्या जाखाऊ बंदराजवळ पाकिस्तानच्या किनाऱ्याला लागून असलेले सौराष्ट्र-कच्छ पार केले. दरम्यान, पुढील 4 दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे.