नवी दिल्ली : 22 फेब्रुवारीची तारीख इतिहासात एका मोठ्या घटनेसह नोंदली गेली आहे. 22 फेब्रुवारी 1997 हा दिवस होता अगदी विशेष ठरला; जेव्हा स्कॉटलंडमधील रॉस्लिन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या पथकाने जाहीर केले की ते सस्तन प्राण्यांपासून घेतलेल्या पेशीपासून 'क्लोन' तयार करण्यात प्रथमच यशस्वी झाले आहेत. या घटनेला दशकातील सर्वात मोठी घटना म्हटले गेले आहे. 'डॉली' नाव असलेल्या या 'क्लोन' मेंढीचा जन्म प्रत्यक्षात 5 जुलै 1996 रोजी झाला होता, मात्र सात महिन्यांनंतर फेब्रुवारीमध्ये याची घोषणा करण्यात आली.
7 वर्ष जगली 'डॉली' : याआधीही क्लोनिंग केले गेले होते, परंतु ते भ्रूण पेशींपासून केले जात होते. क्लोनिंगसाठी प्रौढ पेशीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. 'डॉली' मेंढी सात वर्षे जगली आणि फेब्रुवारी 2003 मध्ये मरण पावली. अनेकांना विज्ञानाची ही अनोखी कामगिरी पाहण्याची संधी मिळावी, म्हणून तिचे शरीर स्कॉटलंडच्या संग्रहालयात जतन करण्यात आले आहे.
क्लोनिंग म्हणजे काय : अमेरिकेच्या नॅशनल ह्युमन जीनोम रिसर्च इन्स्टिट्यूट (NHGRI) च्या मते, क्लोनिंगमध्ये अनेक पद्धती, अनेक दृष्टीकोन असू शकतात, परंतु शेवटी कोणत्याही जीवाची एक समान प्रत तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे, जर मानवी क्लोन बनवता आला, तर तुम्हाला एकसारखे दिसणारे दोन किंवा अनेक व्यक्ती भेटू शकतात. मात्र जरी ते जवळजवळ एकसारखे दिसत असले तरी, क्लोन आणि मूळ एकसारखे नसतील. त्यांच्यात काही फरक असेल. त्यांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांमध्येही फरक असेल.
मानवी क्लोन कसा तयार केला जाऊ शकतो? :मानवी क्लोन तयार करणे खूप कठीण आहे, परंतु जर ते केले तर प्रक्रिया जवळजवळ सारखीच असेल. यामध्ये परिपक्व सोमॅटिक सेल घेतला जाईल. ही त्वचेची पेशी देखील असू शकते. यातून डीएनए घेऊन दात्याच्या अंड्यामध्ये टाकण्यात येईल. या आधी त्या अंड्यातून डीएनए असलेल्या सर्व गोष्टी काढून टाकल्या जातील. अंडी काही काळ चाचणी ट्यूबमध्ये विकसित होईल, त्यानंतर ती सरोगेट मदरच्या आत ठेवली जाईल. या प्रक्रियेला 'प्रजनन क्लोनिंग' म्हणतात.