भोपाळ : गेल्या वर्षी महाशिवरात्रीला उज्जैनमध्ये 11,71,078 मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. आता 21 लाख दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. मेगा इव्हेंटच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी झालेल्या बैठकीनंतर, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 18 फेब्रुवारीला दिवाळीप्रमाणेच उज्जैनमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाईल. महाशिवरात्रीला उज्जैनचे रहिवासी दीपप्रज्वलन करून भगवान महाकालाला आपले समर्पण व्यक्त करतील. ही अभूतपूर्व घटना समाज आणि सरकारच्या सहभागानेच शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री चौहान म्हणाले.
महाशिवरात्रीचे महत्व :महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ पृथ्वीवर उपस्थित असलेल्या सर्व शिवलिंगांमध्ये वास करतात आणि पूजा-अर्चा केल्याने प्रसन्न होतात. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा विशेष उल्लेख आहे. या विश्वाची निर्मिती, संचालन आणि विनाश यासाठी या तिघांना जबाबदार मानले जाते. भगवान ब्रह्मदेवाला निर्माता म्हणून, भगवान विष्णूला रक्षक म्हणून आणि भोलेनाथ शंकराला विनाशाचे प्रतीक म्हणून पूजले जाते. महाशिवरात्रीचा सण भोलेनाथांशी संबंधित असून; या दिवशी भगवान शंकराचा विवाह माता पार्वतीशी झाला होता, म्हणूनच याला 'महाशिवरात्री' म्हणतात. या वेळी महाशिवरात्रीचा उत्सव शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.
महाशिवरात्रीला आहे विशेष योग : 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारीच शनि प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीही साजरी केली जात आहे. प्रदोष व्रताच्या दिवशीही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा पाळले जाते. 2023 मध्ये महाशिवरात्रीला शनि प्रदोषाचा योगायोग होणार आहे. धार्मिक पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता असेल. त्यामुळे 18 फेब्रुवारीला शनि प्रदोष व्रतही पाळले जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीची चतुर्दशी तारीख 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 08:02 वाजता सुरू होईल आणि 19 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 04:18 वाजता समाप्त होईल. निशिता काळात महाशिवरात्रीची पूजा केली जाते.