जयपूर :जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी पुलवामा हल्ल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला. 2019 च्या लोकसभा निवडणुका आमच्या जवानांच्या मृतदेहांच्या मुद्द्यांवर लढल्या गेल्याचा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला. या हल्ल्यामुळे तत्कालीन गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता, असा दावा त्यांनी केला. घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हल्ल्याची माहिती दिली होती, परंतु त्यांनी मला शांत राहण्यास सांगितल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तत्कालीन गृहमंत्र्यांना द्यावा लागला असता राजिनामा :लोकसभा निवडणूक 2019 आमच्या सैनिकांच्या मृतदेहाच्या मुद्द्यावर लढली गेली आणि कोणतीही चौकशी झाली नाही. चौकशी झाली असती तर तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता. अनेक अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकले गेले असते. हा एक मोठा वाद होता, असा दावा सत्यपाल मलिक यांनी अलवर जिल्ह्यातील बांसूर येथील एका कार्यक्रमात केला.
पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान शूटिंग करत होते :लडाख आणि जम्मू आणि काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्याचे विभाजन होण्यापूर्वी सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. यावेळी जम्मू आणि काश्मीरशी संबंधित समस्यांबद्दल मलिक बोलले आहेत. रविवारी कार्यक्रमादरम्यान त्यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ला झाला. मात्र तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये शूटिंग करत असल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला.
पंतप्रधानांनी मला गप्प बसायला सांगितले :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जीम कार्बेटमधून बाहेर आल्यानंतर त्यांचा मला फोन आला. मी त्यांनाआमचे सैनिक मारले गेले आहेत, याबाबतची माहिती दिली. ते आमच्या चुकीने मारले गेले आहेत, याबाबतची माहितीही मी त्यांना दिली. मात्र पंतप्रधानांनी मला गप्प बसायला सांगितल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला. 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या कालावधीत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना विमा योजनेशी संबंधित फाइल्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला 300 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याच्या दाव्याबद्दल सीबीआयने अलीकडेच मलिक यांची चौकशी केली होती.
अदानी प्रकरणावरून हल्लाबोल :अदानी प्रकरणावरून सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. अदानींनी अवघ्या तीन वर्षात खूप संपत्ती निर्माण केली आहे. त्यांची संपत्ती वाढवू शकले आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत अदानी यांना 20 हजार कोटी रुपये मिळाले असून ते 'कुठून आले' असा सवाल सरकारला केला. मात्र पंतप्रधान उत्तर देऊ शकले नाहीत. ते दोन दिवस बोलले पण एका गोष्टीचे उत्तर देऊ शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे उत्तर नव्हते आणि मी म्हणत आहे की हे सर्व त्यांचे पैसे आहेत असेही मलिक म्हणाले.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार :मी गोव्यात होतो, तेथील मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी पंतप्रधानांकडे तक्रार केली. त्याचा परिणाम असा झाला की मला राज्यपालपदावरून हटवण्यात आल्याचा दावाही सत्यपाल मलिक यांनी केला. त्यामुळेच मुख्यमंत्री त्यांच्या हाताखाली भ्रष्टाचार करतात याची मला खात्री असल्याचा हल्लाबोल सत्यपाल मलिक यांनी केला. लोकांना सरकार बदलण्याचे आवाहन सत्यपाल मलिक यांनी यावेळी केले.
हेही वाचा -
- Governor Ramesh Bais : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करावा; राज्यपाल रमेश बैस
- Jayant Patil : जयंत पाटील यांची आज होणार ईडी चौकशी; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कार्यालयाबाहेर घोषणाबाजी
- Sameer Wankhede News: अतिक अहमद सारखी घटना होण्याची समीर वानखेडेंना भीती; मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणार विशेष सुरक्षा