मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम सोमवारी म्हणाले की, 2000 रुपयांची नोट चलनात आणणे आणि त्यानंतर ती रद्द करणे यामुळे भारतीय चलनाच्या अखंडतेवर आणि स्थिरतेवर शंका निर्माण झाली आहे. ते येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच चलनातून 2000 रुपयांच्या नोटा काढून घेण्याची घोषणा केली आहे. लोकांना ही नोट बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलून घेण्यास 30 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे.
'देशाची अर्थव्यवस्था गंभीर अवस्थेत' : चिदंबरम म्हणाले की, 2022 - 23 च्या पहिल्या तीन तिमाहीत 13.2, 6.3 आणि 4.4 टक्के वाढीचा दर नोंदवला गेला, जो घसरणारा ट्रेंड आहे. 2004 ते 2009 मधील तेजीच्या वर्षांच्या सरासरी नऊ टक्के वाढीच्या दरापेक्षा सध्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'वाढती बेरोजगारी, सततची महागाई, वाढती असमानता आणि अडखळत असलेल्या कल्याणकारी कार्यक्रमांबद्दल विरोधकांना गंभीर प्रश्न उपस्थित करणे भाग पडले आहे. देशात बेरोजगारीचा दर सध्या 7.45 टक्के आहे.'
'एनडीए सरकार पूर्णपणे अपयशी' : ते पुढे म्हणाले की, 'मणिपूरमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. तेथे अलीकडील वांशिक संघर्षात 75 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावर सतत मौन आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीच्या दृष्टीने गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सरकार आपल्या चुका सुधारून सर्व लोकांसाठी शासन करण्याचा प्रयत्नही करत नाही.'
'नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य रोखले गेले' : चिदंबरम यांनी आरोप केला की, एनडीए सरकारच्या काळात खोट्या खटल्यांच्या धमक्या देऊन नागरिकांचे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य रोखले गेले आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संलग्न संघटनांनी अति-राष्ट्रवाद, धार्मिक असहिष्णुता, विध्वंस आणि द्वेषयुक्त या ट्रेंडला चालना दिली आहे, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, 'देशातील परिस्थिती वर्षानुवर्षे बिघडत असताना एनडीए सरकारचे नेतृत्व मौन बाळगून आहे याचे आम्हाला दुःख होत आहे.
हेही वाचा :
- Rs 2000 Note Withdrawal: 2 हजारांच्या नोटेने सोने बाजारपेठेची होतेय 'चांदी'