श्रीनगर -पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. सुरक्षा दलाने भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा कट उधळला. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा लष्काराने खात्मा केला. या चकमकीत दोन जवानही हुतात्मा झाले. राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरच्या दादल भागात घुसखोरी व दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाली होती. गुप्त माहितीच्याआधारे सैन्य दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती.
दहशतवाद्यांचा शोध घेणाऱ्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले. मात्र, यात दोन जवान हुतात्मा झाले. श्रीजीत एम आणि मारुप्रोलू जसवंत रेड्डी अशी हुतात्मा जवानांची नावे आहेत. दहशतवाद्यांकडून एके-47 रायफल आणि दारुगोळा जप्त केला आहे.
राजौरी भागात गेल्या 24 तासांत सैनिकांनी रोखलेली ही दुसरी घुसखोरी होती. राजौरी जिल्ह्यात बुधवारी नियंत्रण रेषेवरील लष्कराच्या जवानांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला गोळ्या घातल्या. नियंत्रण रेखा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले.