श्रीनगर :जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. रविवारी सकाळी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. काल रात्री एका, तर रविवारी पहाटे दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा. शोपियानच्या हादीपोरा भागात ही चकमक झाली.
या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांना उपचारासाठी बदामी बाघ येथे नेण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओबैद फारुख, फैजल गुलजार आणि आसिफ बशीर अशी या तीन दहशतवाद्यांची नावं आहेत. अल-बद्रे या दहशतवादी संघटनेसाठी हे तिघे काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांपैकी एक अगदीच नवीन दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याला सुरक्षा दलांकडून शरण येण्याचे आवाहन केले जात होते, मात्र इतर दोघांनी त्याला तसे करु दिले नाही. त्यानंतर चकमकीमध्ये हे तिघे मारले गेले.
यानंतर हादीपोरा भागातील सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली.
हेही वाचा :जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमक; त्रालमध्ये दोन, तर शोपियानमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा