समस्तीपूर (बिहार) -जिल्ह्यातील दलसिंहसरायमध्ये अज्ञातांनी दिवाळीच्या रात्री एका चहा दुकानदाराच्या घरात घुसून अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर, इतर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतामध्ये ६० वर्षीय महिला आणि एका ८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार १० हून अधिक जणांच्या टोळक्याने केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दलसिंहसराय पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयबी रोडवर चहा दुकानदार सुमीत कुमार राय यांचे घर आहे. सुमीत यांच्या घरात अचानक १०हून अधिक जण बंदूकीसह घुसले. त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात ६० वर्षीय महिला हिलिया देवी आणि ८ वर्षीय मुलगा अस्मित याला गोळी लागली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेत तीन महिलांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.