नवी दिल्ली : पूर्व दिग्गज कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या डेमोक्रॅटिक आझाद पक्षातील १७ ज्येष्ठ नेत्यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (17 leaders of Ghulam Nabi Azad party). उल्लेखनीय म्हणजे, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा २० जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल होण्याच्या काही दिवस आधी या नेत्यांनी हे पाऊल उचलले आहे. 50 वर्षे कॉंग्रेस पक्षात घालवल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेस सोडलेल्या आझाद यांनी पक्षातील विविध समस्यांसाठी राहुल यांच्या कार्यशैलीला जबाबदार धरले होते. (17 former leaders join congress).
आयुष्यातील सर्वात मोठी चूक : या नेत्यांच्या प्रवेशावर कॉंग्रेसचे संघटना सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, 'आम्ही त्यांचे स्वागत करतो. ही त्यांची घरवापसी आहे. ही फक्त सुरुवात आहे. भारताच्या एकात्मतेवर विश्वास ठेवणारे आणखी लोक भारत जोडो यात्रेत सामील होतील'. माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी आमदार बलवंत सिंग आणि माजी पीसीसी प्रमुख पीरजादा मोहम्मद सय्यद या नेत्यांनी आझाद यांच्या पक्षात सामील होणे ही 'आयुष्यातील सर्वात मोठी चूक' असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी कबूल केले की काश्मीर मधील लोकांचे गांधी कुटुंबाशी विशेष नाते आहे.
मी सोनिया गांधींचा आभारी : तारा चंद म्हणाले, 'आम्ही काँग्रेसमध्ये ५० वर्षे काम केले. आम्हाला पक्षाकडून खूप काही मिळाले. काँग्रेसने माझ्यासारख्या गरीब गावकऱ्याला प्रोत्साहन दिले. सोनिया गांधींनी मला जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आणि नंतर उपमुख्यमंत्री केले. डीएपीमध्ये सामील होणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. मी भावनिक झालो आणि चुकीचे पाऊल उचलले. मी हे एखाद्याच्या मैत्रीसाठी केले. मला काँग्रेसमध्ये परत येऊ दिल्याबद्दल मी सोनिया गांधींचा आभारी आहे.' तारा चंद म्हणाले की त्यांना आणि इतर अनेकांना आझाद यांनी अचानक काँग्रेसमधून राजीनामा दिल्याची बातमी ऐकायला मिळाली. त्यांना काय चालले आहे याची कल्पना नव्हती. ते म्हणाले, 'मला त्यांच्या शीर्ष नेतृत्वातील समस्या आणि त्यांनी पक्ष का सोडला हे माहीत नाही. आझाद हे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते आणि त्यांना प्रदीर्घ अनुभव होता. एक मित्र आणि नेता म्हणून माझे त्यांच्याशी 40 वर्षांचे संबंध होते'.