विशाखापट्टणम Gang Rape :आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे समाजमन सुन्न करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 17 वर्षीय मुलीवर 13 जणांच्या दोन गटांनी सामूहिक बलात्कार केला.
11 आरोपींना अटक : पीडितेवर आधी तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारानं लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरबी बीचवर 11 आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे सर्व 11 आरोपी फोटोग्राफर आहेत. ही घटना 17 ते 19 डिसेंबर दरम्यान घडली. पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पीडितेला ओडिशातील तिच्या मूळ गावातून विशाखापट्टणम येथे आणण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी झारखंडमध्ये 11 आरोपींना अटक केली आहे असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे.
पीडितेचा मूळ गावी जाऊन शोध घेतला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून 18 डिसेंबर रोजी फोर्थ टाउन पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. ही मुलगी एका सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. तिचा मालक रजेवर गेला होता. ती घरात एकटी होती आणि मालकाच्या पाळीव प्राण्यांची काळजी घेत होती. पोलिसांनी मुलीचा ओडिशातील तिच्या मूळ गावी जाऊन शोध घेतला. ही मुलगी शॉकमध्ये असल्यानं तिला घडलेला प्रकार सांगण्यास थोडा वेळ लागला. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करून तपास सुरू केला.