श्रीनगर -जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने गेल्या 72 तासांत चार चकमकी दरम्यान 12 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, 2021 मध्ये आतापर्यंत तब्बल 40 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे.
लष्कराकडून ठार करण्यात आलेले अतिरेकी अल बद्र, लश्कर-ए-तौयबा (एलईटी) आणि अंसार गजवतुल हिंद (एजीयूएच) या संघटनांचे होते. एजीयूएचचे 7 दहशतवादी, 3 अल बद्र आणि 2 लष्कर दहशतवादी असून त्यात संघटनेच्या प्रमुखांचा समावेश होता, असे डीजीपींनी पत्रकारांना सांगितले. अंसार गजवतुल हिंदमधील 7 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यामुळे संघटना पूर्णपणे पुसली गेल्याची माहिती त्यांनी दिली.
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अल बद्र या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले. ओबैद फारुख, फैजल गुलजार आणि आसिफ बशीर अशी या तीन दहशतवाद्यांची नावं आहेत. या तिघांपैकी एक अगदीच नवीन दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याला सुरक्षा दलांकडून शरण येण्याचे आवाहन केले जात होते, मात्र इतर दोघांनी त्याला तसे करु दिले नाही. त्यानंतर चकमकीमध्ये हे तिघे मारले गेले.