श्योपूर (मध्य प्रदेश) : नामिबियातून 8 चित्ते आल्यानंतर आता कुनो नॅशनल पार्कमध्ये (kuno national park) दक्षिण आफ्रिकेतूनही 12 चित्ते आणण्याची तयारी सुरू झाली आहे. (Cheetah from South Africa in India). दक्षिण आफ्रिकेत साडेतीन महिन्यांसाठी 12 चित्ते क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांना 15 डिसेंबरपर्यंत भारतात श्योपूर कुनो येथे आणले जाऊ शकते. या चित्यांसाठी कुनोमध्ये आठ नवीन एन्क्लोजरही तयार केले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या वन आणि पर्यावरण मंत्री बार्बरा क्रेसी यांनी चीता प्रकल्पासाठी भारतासोबतच्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. कागदपत्रे आता अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याकडे आहेत.
दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात येणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 17 सप्टेंबर रोजी श्योपूर येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्ते सोडण्यात आले. जुलै 2022 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला चित्ता प्रकल्पासाठी 12 चित्ते देण्याची विनंती केली होती. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते एकत्रच आणले जाणार होते. चित्ता निवडण्यापासून ते वेगळे ठेवण्यापर्यंतची सर्व तयारी नामिबिया तसेच दक्षिण आफ्रिकेत एकाच वेळी पूर्ण झाली होती. मात्र त्यावेळी चित्ता आणण्यासाठी दक्षिण आफ्रिकेशी सामंजस्य करार होऊ शकला नव्हता. त्यामुळे नामिबियातील 8 चित्ते भारतात आले, परंतु दक्षिण आफ्रिकेतील 12 चिते क्वारंटाईन एन्क्लोजरमध्ये बंद राहिले.