दिल्ली Nirbhaya Case :राजधानीत दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी घडलेल्या निर्भया हत्याकांडानं देशाला हादरा बसला होता. या घटनेनंतर सरकार बदललं, न्याय व्यवस्थेत बदल झाले. मात्र एवढं होऊनही दिल्लीत राहणाऱ्या महिलांवरील अत्याचारात कोणतीही घट झाली नाही. याबाबत राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं नुकताच अहवाल दिला आहे. या अहवालातून दिल्लीत महिला सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं.
सहा नराधमांनी केला होता सामूहिक अत्याचार :दिल्लीत 16 डिसेंबर 2012 ला सहा नराधमांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार करुन तिला चालत्या बसमधून फेकून दिलं होतं. नराधमांनी केलेल्या अत्याचारामुळं 29 डिसेंबर रोजी सिंगापूरमधील रुग्णालयात उपचारादरम्यान निर्भयाचं निधन झालं होतं. त्यानंतर संपूर्ण देश संतप्त झाला होता. नागरिकांनी ठिकठिकाणी निदर्शनं करत निर्भयाला न्याय देण्याची मागणी केली होती. निर्भयाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट, दिल्ली हायकोर्ट नंतर सर्वोच्च न्यायालयात साडेसात वर्षे चालला. अखेर 20 मार्च 2020 ला निर्भया हत्याकांडातील चार दोषींना फाशी देण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. न्यायालयानं दिलेल्या या निर्णयानं निर्भयाला न्याय मिळाला. मात्र आजही देशातील 19 शहरांमध्ये महिला अत्याचारांची प्रकरणं मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तर महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिल्ली आजही आघाडीवर असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे.
दिल्लीत महिलांवरील गुन्ह्यात झाली वाढ :दिल्लीत झालेल्या निर्भया हत्याकांडानंतर देशभरात खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर दिल्लीत महिलांवरील अत्याचारात घट होईल, अशी सगळ्यांची आशा होती. तरीही नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनं जाहीर केलेल्या आकडेवारीत 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये महिलांवरील गुन्ह्यांत वाढ झाली आहे. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिल्ली सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानावर आहे. दिल्लीत 2021 मध्ये दररोज बलात्काराच्या दोन घटनांची नोंद करण्यात आली होती. बलात्काराची ही संख्या 2022 मध्ये वाढून तीन झाली आहे. 2021 मध्ये महिलांवरील गुन्ह्यांची संख्या 13 हजार 892 होती, ती आता 2022 मध्ये वाढून 14 हजार 158 झाली आहे.