जालंधर - चित्रकारी कोणाचा छंद असतो तर कोणाचा पेशा तर काहींचा आत्मा. सुंदर चित्र कोणाचेही मन प्रफुल्लित करते. जालंधर येथे राहणारा भव्य (Bhavya) ही मनमोहक चित्र काढतो. पाचवी वर्गात शिकणाऱ्या भव्यने कोरोना लॉकडाऊन काळात घरात बसून इतकी सुंदर चित्रे काढली की, लोक या चित्रांकडे बघतच राहिले. आपल्या या अप्रतिम चित्रकारीमुळे भव्य आता खूप प्रसिद्ध झाला आहे.
जालंधरच्या रोज गार्ड परिसरात नील बत्रा राहतात व तेथेच त्यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्यांच्या कुटूंबात पत्नी वंदना, मोठा मुलगा तनीश व छोटा मुलगा भव्य आदी सदस्य आहेत. नील मागील अनेक दिवसांपासून येथे राहतात, मात्र लोक आता भव्यचे पप्पा म्हणून अधिक ओळखतात. कारण भव्यने छोट्या वयात चित्रकारीमध्ये अशी प्रतिभा दाखवली आहे, ज्याची चर्चा पंजाबसह संपूर्ण देशात होत आहे.
10 वर्षाच्या भव्यने आपल्या छोट्या हातांनी महापुरुषांची व प्रसिद्ध लोकांची चित्रे काढली आहेत. आता अनेक लोक भव्यकडून आपली चित्रे काढून घेत आहेत. भव्य सांगतो की, त्याने वयाच्या सहाव्या वर्षापासून चित्रकारी सुरू केली. आतापर्यंत त्याने अनेक प्रसिद्ध व्यक्तींची चित्रे काढून त्यांना भेट दिली आहे. त्याने भगत सिंग, राजगुरु, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम सारख्या महान व्यक्तींचे पेंटींग बनवले आहे.