चंदीगड (पंजाब) -पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पोलीस सातत्याने छापे टाकत आहेत. मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या हत्येप्रकरणी 10 शार्प शूटर्सची ओळख पटवली आहे. हे सर्व जण लॉरेन्स गँगशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. हे शार्पशूटर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील असल्याचीही माहिती समोर आली आहे.
एका संशयिताला अटक -या शार्प शूटर्सच्या शोधासाठी पोलीस सातत्याने छापे टाकत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील एक नेमबाज राजस्थानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाब पोलिसांव्यतिरिक्त दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमधील पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दविंदर उर्फ काला नावाच्या तरुणाला अटक केली आहे. फतेहाबाद पोलीस ठाण्यात दविंदर विरोधात एनडीपीएसचे सहा गुन्हे दाखल केले आहेत तर पंजाबमध्ये दविंदरविरोधात 2 किलो अफू जप्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.