ETV Bharat / state

महाराष्ट्र हा पवित्र आत्म्यांचा प्रदेश, इथं गुजरातचा आत्मा भटकतोय ; संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Pm Modi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 2:29 PM IST

Sanjay Raut Attack On Pm Modi
संपादित छायाचित्र

Sanjay Raut Attack On Pm Modi : पुणे इथं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना 'भटकती आत्मा' असा उल्लेख केला होता. त्याला आता संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'गुजरातचा अतृप्त आत्मा' वारंवार महाराष्ट्रात का येत आहे, सवाल संजय राऊत यांनी यावेळी विचारला आहे.

खासदार संजय राऊत

मुंबई Sanjay Raut Attack On Pm Modi : महाराष्ट्र राज्य एका भटकत्या आत्म्याचं शिकार झालं आहे, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुण्यातील प्रचार सभेत शरद पवार यांचं नाव न घेता केली. भटकत्या आत्म्याच्या या मुद्द्यावरून आता राजकारण तापलं असून उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतृप्त आत्मा वारंवार महाराष्ट्रात का भटकत आहे ? असा सवाल संजय राऊतांनी केला. हा आत्मा पंतप्रधानपदी बसला तर देशात भुताटकी येईल, असं रोखठोक उत्तर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. संजय राऊत हे मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अशा भुताटकीच्या आत्म्यांना महाराष्ट्र जुमानत नाही : संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत. मग औरंगजेबाचा आत्मा असेल, अफजलखानाचा आत्मा असेल, हे 450 वर्षापासून भटकत आहेत. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसांचे शत्रू आहेत. ज्यांनी महाराष्ट्राला गाडलं आहे, अशा सर्वांचे आत्मे गेल्या 450 वर्षांपासून भटकत आहेत. त्यात आता हा नवीन गुजरातचा आत्मा आला आहे. मात्र अशा भुताटकीच्या आत्म्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा, फेकाफेकी याला कधीही महत्त्व देत नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. हा पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. उद्या 1 मे आहे, यासाठी 105 आत्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, ते उद्या पंतप्रधान मोदींना शाप देणार आहेत. कारण मोदींनी जेवढे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नुकसान केलं आहे. तेवढं आतापर्यंत कोणी केलं नसेल. यासाठी या अतृप्त आत्म्यांविरुद्ध ही महाराष्ट्राची लढाई आहे. उद्या एक मे महाराष्ट्र दिन आहे. या दिवशी आम्ही या 105 हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहोत. त्यांना सांगू महाराष्ट्र विरोधी जे आत्मे भटकत आहेत, आम्ही त्यांचा बदला घेऊ."

भाजपाला संविधान बदलायचं आहे : संजय राऊत पुढं म्हणाले की, "सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात होते, परंतु त्यांनी साधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेखही केला नाही. कारण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे. त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर राग आहे. म्हणून त्यांचं आत्मे महाराष्ट्रात भटकत आहेत. त्यांना संविधान बदलायचं आहे आणि शिवसेना या विरोधात ठामपणे उभी आहे."

आम्ही पंतप्रधान लादणारे नाहीत : पंतप्रधान पदासाठी देशात अनेक चेहरे आहेत, या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आमच्याकडं पंतप्रधान पदाचे 5 चेहरे असले तर काय झालं? हे लोकशाहीसाठी उत्तम उदाहरण आहे. लोक स्वीकारतील तो प्रधानमंत्री होईल. आम्ही भाजपाप्रमाणं प्रधानमंत्री लादणार नाही. तुमच्यासारखा एक चेहरा बसला, तर या देशाची भुताटकी होऊन जाईल."

आम्ही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार : मुंबई उत्तर मध्य या जागेवर काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसचे नेते नसीम खान नाराज आहेत. या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आम्ही नसीम खान यांना कधीही विरोध केला नाही, करणार नाही. जात आणि धर्म पाहून आम्ही कधी उमेदवार ठरवत नाही. आम्ही उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीतील मित्र पक्षांशी चर्चा करतो. नसीम खान हे सुद्धा तितकेच तोला मोलाचे योग्य उमेदवार आहेत. मुंबई काँग्रेसचे ते वर्किंग प्रेसिडेंट आहेत. त्यांनी तयारी सुद्धा केली होती. ते आम्हाला वेळोवेळी भेटत होते. जो महाविकास आघाडीचा, काँग्रेसचा उमेदवार आहे. तो शिवसेनेचा उमेदवार आहे. आता जरी काँग्रेसला वाटत असेल, तर त्यांनी उमेदवारी बदलावी. शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची हा काँग्रेस वर्किंग कमिटीचा प्रश्न आहे," असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. तुमच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा, पंतप्रधान मोदींचा दावा - PM Modi solapur meeting
  2. पंतप्रधान मोदींच्या 'त्या' विधानावरून तापलं राजकारण; "ते शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना? ", जितेंद्र आव्हाड यांचा सवाल - PM Modi Maharashtra visit
  3. "महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार...", शरद पवारांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींची टीका - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.