ETV Bharat / politics

तुमच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा, पंतप्रधान मोदींचा दावा - PM Modi solapur meeting

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 11:39 AM IST

Updated : Apr 30, 2024, 1:19 PM IST

PM Modi Malshiras public meeting
PM Modi Malshiras public meeting

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माळशिरस येथे भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी विराट सभा घेतेली. यावेळी त्यांनी शेतकरी, साखर उद्योगांवरून नाव न घेता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली. राममंदिर आणि वारसा संपत्ती कायद्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला.

सोलापूर- माढा लोकसभा मतदारसंघ हा धनगर समाजाचे मताधिक्य म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे प्राबल्य असून धनगर समाजाची निवडणुकीत भूमिका निर्णायक राहते. त्यामुळे म्हणून आजच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खांद्यावरती घोंगडे आणि डोक्यावरती पिवळी पगडी असा पेहराव केला होता.

"येळकोट येळकोट जय मल्हार" असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. मागील साठ वर्षांमध्ये काँग्रेसने जे काही केले नाही, ते काम आमच्या सरकारने दहा वर्षांमध्ये केले, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. गेल्या दहा वर्षांमध्ये रस्ते, वीज, विमानसेवा, रेल्वे यासाठी विकास निधी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला असल्याचे सांगितले.

शरद पवार यांच्यावर टीका- यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. "15 वर्षांपूर्वी एका मोठ्या नेत्याने या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना या भागातील दुष्काळ हटवता आलं नाही. या भागामध्ये पाणी पोहोचवता आले नाही. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात त्यांना उभे राहण्याची हिंमत राहिली नाही, असाही हल्लाबोल मोदी यांनी केला. हाच बडा नेता दिल्लीमध्ये कृषिमंत्री असताना ऊसाची एफ आरपी वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. आम्ही मात्र उसाची एफ आर पी 220 रुपयावरून 340 रुपये केली."

काँग्रेसवर साधला निशाणा- पुढे पंतप्रधान म्हणाले, " स्थिर सरकार असेल तर भविष्यातील योजनांवरती लक्ष देता येते. मात्र काँग्रेस 270 जागाही लढवित नाही. तर बहुमताचा आकडा कसा पार करणार? स्थिर सरकार कसे येणार ?असा सवाल करत माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्य देऊन निवडून आणा," असे पंतप्रधान मोदींनी मतदारांना आवाहन केले. सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा पारा वाढत आहे. परंतु येणाऱ्या सात तारखेला मतदान करत असताना पहिले मतदान करा, त्यानंतर पाणी प्या, असे पंतप्रधानांनी म्हटले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांची दडपशाही आणि दहशत संपवणार असल्याचेही सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • ५०० वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. राममंदिर अयोध्येत तयार झाले. तुमच्या मताच्या ताकदीमुळे हे शक्य झाले. या पुण्यावर तुमचा हक्क आहे. तुमचे मत हे मजबूत सरकारसाठी हवं आहे.
  • साखर कारखान्यांच्या प्राप्तिकराची समस्या होती. ही समस्या सोडवून त्यांना १० हजार कोटी रुपयांची माफी दिली. त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला.
  • आपल्या मुलासाठी प्रत्येकजण बचत करतो. मात्र, त्यावरही सरकारचा हक्क असल्याचे काँग्रेस सांगत आहेत. १० एकर जमीन असेल तर तुमच्यानंतर ५ एकर जमीन सरकार घेईल. गावात घर आणि शेतात घर असेल तर एक घर हे सरकार घेईल. काँग्रेसचा विचार हा नक्षलवादी आणि मार्क्सवाद्यांचा विचार धोकादायक आहे. यांचा एकही खासदार दिल्लीत जाऊ नये. तुमची संपत्ती लुटणारे काँग्रेसचे सरकार हवे आहे का? तुमच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे.
  • २०१४ पूर्वी कोणाचे सरकारवर होते? मोठ्या-मोठ्या गोष्टी बोलतात. मात्र, त्यांनी काही केलं नाही.
  • ६० वर्षांत काँग्रेसनं केले नाही, ते आम्ही १० वर्षांत केले.
  • सिंचनाची कामे वेगानं करत आहोत. १० वर्षांत सगळी अशक्य कामे केली आहेत.
  • कोरडवाहू शेतीत पाणी देण्याची योजना आखली आहे. त्याचा येणाऱ्या पिढीला फायदा होणार आहे. घरोघरी पाणी देणे हे आमचे मिशन आहे. सहकार विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा तब्बल 53 एकर कृषी विभागाची जागा घेण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी 28 एकर वर सभामंडप उभारला आहे. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी ही सभा अकलूज येथे घेतली होती. मात्र तेव्हा अकलूज येथील सभेचे नियोजन मोहिते पाटील यांनी केले होते. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहिले. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य सभा मंडप देण्यात आला. तसेच पिण्याच्या पाण्याची ही सोय करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून सोलापूरमध्ये उष्णतेचा पारा तापला असल्यामुळे भर उन्हामध्ये ही सभा होत असताना राजकीय वातावरणही तापणार आहे.

वाहतूक मार्गामध्ये बदल- गेल्या दोन दिवसांमध्ये सोलापूर येथे 43.7 अंश सेल्सियस इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे भर उन्हामध्ये किती मतदारांची उपस्थिती राहणार आहे, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. परिसरात तीन किलोमीटरपासून येणारी वाहने इतर बाजूने वळवण्यात येत आहेत. माळशिरस तालुक्यातील वाहतूक मार्गामध्ये हे बदल करण्यात आला आहे.

माळशिरस मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला- माळशिरस तालुका हा मोहिते पाटील यांचा गड मानला जातो. यामध्ये मोहिते पाटील समर्थकांची संख्या लक्षणीय आहे. भाजपाने उमेदवारी नाकारल्यानं धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या गटातून उमेदवारी घेत माढा लोकसभेची निवडणूक ही अटीतटीची केलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूर येथे विराट सभा घेतली. त्यानंतर आज पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी मोदींची जिल्ह्यात दुसरी सभा होत आहे. त्यामुळे भाजपानं माढा लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा केला असल्याचं चित्र आहे.

Last Updated :Apr 30, 2024, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.